
⭕ ठाण्यात 900 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय लवकरच नागरिकांच्या सेवेत.
ठाणे ता १४ : ठाण्यातील सर्वसामान्य, गरीब व गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरणारे विठ्ठल सायन्ना रुग्णालय (जिल्हा सामान्य रुग्णालय) डिसेंबरअखेर नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर, पदाधिकारी, बांधकाम विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत रुग्णालयाची आज पाहणी केली. 900 खाटांची क्षमता, एअर ॲम्ब्युलन्सची सुविधा, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सर्व प्रकारच्या उपचार सुविधांनी सज्ज असलेले हे रुग्णालय ठाणेकरांसह संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे नवे केंद्र ठरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
यावेळी पाहणी सभागृह नेते हणमंत जगदाळे, शिवसेना गटनेते तथा स्थानिक नगरसेवक पवन कदम, सुधीर कोकाटे, माजी नगरसेविका पूजा वाघ, महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, ऋषिकेश जवळकर, आरोग्य विभागाच्या डॉ. योगिता धायगुडे, माता-बालसंगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांकडून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णालयातील विविध विभाग, उपचार कक्ष, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, ऑपरेशन थिएटर आणि इतर आवश्यक सुविधांची माहिती घेण्यात आली. या रुग्णालयात 900 खाटांची सुविधा, एअर ॲम्ब्युलन्स, आधुनिक निदान यंत्रणा, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, आयसीयू, विविध सुपर स्पेशालिटी विभाग, कर्करोगावर उपचार तसेच सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून नागरिकांना मुंबईकडे धाव घेण्याची गरजही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. गरीब आणि गरजू रुग्णांना एकाच छताखाली दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा या प्रकल्पाचा उद्देश असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले.









