
दिवा उड्डाणपूलासाठी संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला अद्यापही प्रलंबित; न्यायासाठी न्यायालयात जाणार – पांडुरंग भोईर
दिवा | प्रतिनिधी : दिवा रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या आपल्या जमिनीचा योग्य मोबदला अद्याप मिळालेला नसल्याचा दावा पांडुरंग भोईर यांनी केला आहे. अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नसल्याने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याचे सांगितले.
पांडुरंग भोईर यांनी सांगितले की, संबंधित प्रशासनाकडून जबरदस्तीची भूमिका घेतली गेली असून, त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना अद्याप योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आपल्या हक्कासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करून न्यायालयात आपली बाजू ठामपणे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिवा रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लागल्याचा आभास निर्माण केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक बाधित नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः जमिनीचा मोबदला आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यांवर प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
(टीप : संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सर्व संबंधित पक्षांची अधिकृत भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही द टाईम्स ऑफ महाराष्ट्राकडून करण्यात येईल.)








